सावधान ! पुरामुळे पुण्यातील 500 कुटूंबांना ‘सुरक्षित’ ठिकाणी हलवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि उपनगर भागामध्ये पावासाचा जोर वाढल्याने नद्या नाल्यांना पुर आले आहेत. मावळ आणि परिसरात होत असलेल्या मुसळाधार पावसामुळे मुळशी आणि पवना धरण १०० टक्के भरले आहे. तर पुण्यातील धरणक्षेत्रात देखील मुसळधार पाऊस पडत असल्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्याा धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. हे पाणी नदी काठच्या घरांमध्ये शिरत असल्याने पुणे महानगरपालिकेने ५०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाने कुटुंबांना नानासाहेब पुरुळेकर विद्यालय आणि वि.द. घाटे शाळेमध्ये स्थलांतरीत केले आहे. तर काही कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे मुळा मुठा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या नागिकांना सतर्कचेचा ईशारा देण्यात आला आहे.

मुळा नदीमध्ये मुळशी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे देहूरोड-कात्रज बाह्यवळणावर असलेल्या सुर्या हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. याठिकाणी आपत्तीव्यवस्थापनाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून रुग्णांना सुरुक्षीत स्थळी हलवण्यात येत आहे.

झेड ब्रीजवर वाहतुक कोंडी

नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी झेड ब्रीजवर गर्दी केल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. झेड ब्रीजवर तरुणांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नाही. या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी तैनात नसल्याने रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

त्याच प्रमाणे हॅरीस ब्रीजवर देखील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. हॅरीस ब्रीजच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली असून पिंपरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.

You might also like