‘कोरोना’च्या टेस्टिंगमध्ये भारतानं तोडलं ‘रेकॉर्ड’, दररोज होतायेत एक लाखाहून अधिक चाचण्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे १.१९ लाखांवर गेली आहेत. तर या विषाणूमुळे ३,६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढाईसाठी आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर पूर्णपणे तयार झाले आहे. ज्यामुळे देशात दररोज एक लाखाहून अधिक टेस्ट केल्या जात आहेत. यादरम्यान खाजगी लॅब देखील टेस्टमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. तसेच दुसरीकडे कोरोना टेस्ट किटचे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. लवकरच दररोज पाच लाख किट तयार होऊ शकतील.

आयसीएमआरचे वैज्ञानिक डॉ. गंगाखेडकर यांच्या मते, मंगळवारपासून देशात दररोज सुमारे एक लाखाहून अधिक टेस्ट होत आहेत. ज्यामुळे शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत देशात २७,५५,७१४ टेस्ट झाल्या आहेत. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात खासगी लॅबही महत्त्वाची भूमिका बजावत असून तिथे आतापर्यंत १८,२८७ टेस्ट केल्या गेल्या आहेत. लोकांवर बोजा पडू नये म्हणून सरकार आयसीएमआर लॅबमध्ये कोरोनाची अधिक चाचणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तपासणीमुळेच दररोजच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये केवळ २०-४० हजारच चाचण्या घेतल्या जात होत्या. जे समोर ठेवून सरकार विरोधी पक्षांवर निशाणा करत असत.

एम्पॉवर्ड ग्रुप १ चे चेअरमन डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले की, भारतात कोरोना डायग्नोस्टिक किटचे उत्पादन सुरू झाले आहे. पुढील ६-८ आठवड्यात आम्ही दररोज पाच लाख किटची निर्मिती करण्यास सुरवात करू. याशिवाय ५ कंपन्या आणि ४ ते ६ शास्त्रज्ञांची टीम कोरोनाची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, जर भारतात वेळीच लॉकडाऊन लागू केले नसते, तर आज भारतातील परिस्थिती अत्यंत वाईट झाली असती. हे बर्‍याच मॉडेलमधून समोर येत आहे की, देशात कोरोनामुळे ३७-७८ हजार मृत्यू होऊ शकतात, तसेच १४-२९ लाख प्रकरणे समोर येऊ शकतात. सरकारने योग्य वेळी लॉकडाऊन लागू केले, ज्यामुळे प्रकरणे इतकी वाढली नाहीत. ते म्हणाले की, जेव्हा देशात लॉकडाऊन लागू केले तेव्हा कोरोना विषाणूची प्रकरणे दुप्पट होण्याचे प्रमाण दिवसाला ३.४ होते, जे आज १३.३ आहे. तसेच कोरोना मृत्यू दर देखील पहिल्यापेक्षा कमी झाला आहे.