Coronavirus : सावधान ! राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 30 % रुग्ण पुण्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील 30 टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण (Active Paatients) पुणे जिल्ह्यात (Pune) आहेत. त्या पाठोपाठ ठाण्यात 17 टक्के (Thane) आणि मुंबईमध्ये 13 टक्के (Mumbai) सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

राज्यात 58 हजार 91 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 14 हजार 558 रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यात 10 हजार 537 आणि मुंबईत 8 हजार 260 रुग्ण आहे. देशात सक्रिय रुग्णांचे प्रमाण 2.9 टक्के असून राज्यात हे प्रमाण 3.07 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात 18 लाख 7 हजार 824 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात सक्रिय असलेल्या एकूण रुग्णांपैकी 7 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर आहेत. तर 6 टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत 61 टक्के पुरुष तर 39 टक्के महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये अतिजोखमीच्या आजारांमुळे 70 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला असून 30 टक्के मृत्यू अन्य कारणामुळे झाले आहेत. राज्यात मृत्यू झालेल्या मृतांमध्ये 65 पुरुष आणि 35 टक्के महिला रुग्ण आहेत.