ज्योतिषशास्त्रातील दोन सर्वांत धोकादायक रत्नं, जाणून घ्या कसा परिणाम होतो मानवी जीवनावर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आपल्या सौरमंडळात नऊ ग्रह आहेत, ज्यांच्या आतमध्ये वेगवेगळे तरंग आढळतात. आपल्या शरीरातसुद्धा नऊ ग्रह आहेत, जे आकाशातील ग्रहांशी जोडलेले आहेत. जेव्हा आकाश मंडळातील ग्रहांशी शरीरातील ग्रहांचा संबंध तुटतो, तेव्हा शरीर आणि मनात समस्या होऊ लागतात. रत्न धारण करून आपण या तरंगांना ठीक करू शकतो आणि शरीर, मनाच्या समस्या दूर करू शकतो. परंतु, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक रत्न घालू शकत नाही. यासाठी विचारपूर्वकच रत्न धारण केले पाहिजे. ज्योतिषमध्ये दोन रत्न सर्वांत जास्त शक्तिशाली आहेत आणि धोकादायकसुद्धा. यातील पहिले रत्न आहे हिरा आणि दुसरे आहे नीलम.

हिर्‍याचे सामान्य जीवनातील महत्त्व

हिरा नवरत्नांमधील सर्वांत मौल्यवान आणि कठीण रत्न मानले जाते. अनेक लोक हे सौंदर्य आणि किमतीमुळे मोठ्या प्रमाणात वापरतात. हे ज्योतिषमध्ये शुक्राचे रत्न मानले जाते. हे धारण केल्याने सुख, सौंदर्य आणि संपन्नता प्राप्त होते. हे वैवाहिक जीवन आणि रक्तावर थेट परिणाम करते. शुक्राकडून लाभ घेण्यासाठी आणि जीवनात ग्लॅमर वाढवण्यासाठी हे रत्न अचूक असते.

हिरा धारण करताना सावधान

सल्ला न घेता केवळ फॅशन आणि प्रदर्शनासाठी हिरा धारण करू नका. जर मधुमेह किंवा रक्ताची एखादी समस्या असेल तरीसुद्धा हिरा धारण करू नका. वयाच्या 21 वर्षांनंतर आणि 50 वर्षांच्या अगोदरच हिरा धारण करणे चांगले असते. जर वैवाहिक जीवनात समस्या असतील आणि हिरा परिधान केला तर त्या अचानक वाढू शकतात. हिरा जेवढा जास्त सफेद असेल तेवढा तो चांगला असतो. डाग असलेला हिरा किंवा तुटलेला हिरा अपशकुन किंवा दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. हिर्‍यासोबत प्रवाळ (पोवळे, मुंगा) किंवा गोमेद धारण केल्यास चरित्रहनन होऊ शकते, असे करू नये.

ही आहेत नीलम रत्नाची वैशिष्ट्ये

नीलम शनीचे मुख्य रत्न आहे, हे प्रामुख्याने वायुतत्वाला नियंत्रित करते. याचा रंग सामान्यतः निळा असल्याने यास नीलम म्हणतात. याचे नाव शनिप्रियसुद्धा आहे, जे नंतर सफायर झाले. हे कुरुन्दम समूहाचे रत्न आहे आणि माणिक्यसोबत आढळते. शनीकडून लाभ घेण्यासाठी आणि त्यास संतुलित करण्यासाठी हे धारण केले जाते. हे धारण करताना मोठी सावधगिरी बाळगावी लागते. योग्य सल्ला आणि तपासणीशिवाय हे धारण करणे धोकायदाय आहे. चुकीच्या सल्ल्याने नीलम धारण केल्यास जीवन अस्ताव्यस्तसुद्धा होऊ शकते.

नीलम धारण करण्याचे हे आहेत नियम

कुंडलीतील तत्वांशिवाय आणि शनी जाणून घेतल्याशिवाय नीलम धारण करू नका. धारण करण्यापूर्वी नीलमची आणि स्वत:ची तपासणी करा. हे लोखंड किंवा चांदीमध्ये धारण करण्याचा प्रयत्न करा. सोन्यात धारण करणे खूप अनुकूल होणार नाही. नीलम रत्न शनिवारी मध्यरात्री धारण केल्यास उपयुक्त ठरते. नीलम डाव्या हातात परिधान करा आणि यासोबत जलतत्वाचे रत्न जरूर धारण करा. चौकोनी नीलम घालणे जास्त चांगले आणि शुभ असते. धारण करण्यापूर्वी शिव आणि शनी देवाला आवश्य समर्पित करा.