सर्वाधिक हॅक होणार्‍या पासवर्डची यादी जाहिर ; जाणून घ्या आणि आत्‍ताच तुमचा पासवर्ड सुरक्षित करा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. बोटावर मोजण्या इतपत लोक वगळता सर्वांकडून ऑनलाईन अकाऊंटचा वापर होतो. कुठलेही ऑनलाईनचे अकाऊंट असो त्याला युझरनेम आणि पासवर्ड द्यावाच लागतो. प्रत्येकाकडे एकाहुन अधिक ऑनलाइन अकाऊंट आहेत. त्यामुळेच बहुतांशजण त्यांच्या ऑनलाईन अकाऊंटचा पासवर्ड एकच ठेवतात आणि तो देखील लक्षात राहण्यासारखाच. सोपा, लक्षात राहण्यासारखा पासवर्ड निवडल्याने हॅकर्स सहजरित्या तो पासवर्ड क्रॅक करू शकतात आणि त्यामुळे ऑनलाईन अकाऊंट वाल्यांचे मोठे नुकसान होते. आता तर युकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने (NCSC) सर्वाधिक हॅक होणार्‍या पासवर्डची यादीच जाहिर केली आहे. त्या यादीमध्ये आपला पासवर्ड असेल तर तुम्ही आत्‍ताच तुमचा पासवर्ड बदलुन तो सुरक्षित करून घ्या.

‘123456’ हा जगभरातील सर्वात कॉमन पासवर्ड असून तो अगदी सहजपणे हॅक केला जाऊ शकतो. त्याच्या खालोखाल ‘123456789’ हा पासवर्ड आहे. ‘qwerty’, ‘1111111’ आणि ‘password’ हे देखील असुरक्षित पासवर्डच्या यादीत ‘टॉप’वर आहेत. ‘123456’ हा पासवर्ड वापरणारे 2 कोटी 30 लाख युझर आहेत.

पासवर्ड म्हणून काहीजण आपले किंवा आपल्या जवळच्या व्यक्‍तीचे नाव वापरतात. त्यामध्ये ‘Ashley’, ‘Michael’, ‘Daniel’, ‘Jessica’ आणि ‘Charlie’ ही सर्वात कॉमन आहेत. अशा प्रकारचे पासवर्ड हॅकर्स अगदी कोणत्याही अडचणीशिवाय हॅक करू शकतात. काही युजर्स क्रिकेट, फुटबॉल टीम, बॅटमॅन आणि सुपरमॅन यासारखे आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टरही आपले पासवर्ड म्हणून ठेवतात. NCSCचे तांत्रिक संचालक डॉ इयान लेवी यांच्या माहितीनुसार जे लोक सर्वात कॉमन पासवर्डचा वापर करतात. ते हॅकिंगसाठी निमंत्रण देतात. त्यामुळे आपला पासवर्ड अशांपैकी असेल तर तो तात्काळ बदला आणि पासवर्ड सुरक्षित करून घ्या.