Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ Break मध्येही पुणेकर नंबर 1

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. अशातच महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. असे असताना आता लोकडाऊनचा नियम तोडण्यातही पुणेच अव्वल असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू झाल्यापासून २७,४३२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पुण्याचा पहिला क्रमांक लागला आहे.

२२ मार्च पासून ते ०८ एप्रिलपर्यंतची लॉकडाउन उल्लंघनाची आकडेवारी

२२ मार्च पासून ते ०८ एप्रिल पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाउनचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारपर्यंत २७,४३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भादंवि कलम १८८नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे शहरी भागातच लॉकडाउनच्या काळात लोक बाहेर पडत असल्यानं सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

विविध शहरातील आकडेवारी

विशेष म्हणजे सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद पुण्यात झाली आहे. ३ हजार २५५ लोकांवर विनाकारण बाहेर फिरत असल्यानं पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर अहमदनगर २ हजार ४४९, नागपूर १९९९, पिंपरी-चिंचवड १९९३, मुंबई १६७९ आणि नाशिक १६४८ असे गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या तब्बल १२, ४२० गाड्या पोलिसांकडून जप्त
मागील तीन आठवड्यात पोलिसांनी १ हजार ८८६ लोकांना अटक केली आहे. यात होम क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ४३८ लोकांचा समावेश आहे. ६० जणांना पोलिसांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर फिरणाऱ्या १२, ४२० गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.