कवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १० वर्षापासून फरारी अट्टल आरोपी गजाआड

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – कवठेयेमाई, ता.शिरूर, जि.पुणे येथील दुहेरी खुनासह दरोड्याचे गुन्हयातील १० वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.संदीप पाटील यांचे आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित जात असताना २८ जानेवारी २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे टिमला मिळालेल्या बातमीवरून सुमारे १० वर्षांपासून दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील फरार असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याचेवर सन २००९ मध्ये कवठे यमाई ता.शिरूर येथे दुहेरी खुनासह घरावर दरोडा टाकल्याचा गंभीर गुन्हा दाखल होता.

दिनांक २२ डिसेंबर २००९ रोजी कवटेयमाई, तावरे वस्ती ता.शिरूर येथे राहणारे बबन बापू दाभाडे हे शेतात गेले असताना रात्री ०२.३० वा. चे सुमारास १० ते १२ चोरटयांनी फिर्यादीचे वडील बापू दाभाडे वय ७५ हे घराबाहेर झोपले असताना त्यांना लोखंडी गजाने तोंडाला व डावे कानास जबर मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर चोरटयांनी फिर्यादीचे घराचे खिडकीवाटे आत प्रवेश करून फिर्यादीची आई विठाबाई दाभाडे वय ६५ वर्षे व बहीण ताराबाई दाभाडे वय ४४ वर्षे यांनाही डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले व त्यांचे अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम १००००/- असा एकूण ५०,००० / – रूपये किंमतीचा ऐवज खुनासह दरोडा टाकून जबरीने चोरून नेला होता. फिर्यादीची आई विठाबाई दाभाडे या चोरटयांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मयत झाल्या होत्या.
शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून यापूर्वी ८ आरोपी पकडले होते. तेव्हापासून फरार असलेला आरोपी राजू नारायण भोसले हा आपले नाव बदलून मांडवगण परिसरात राहत असलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली होती. खबऱ्याने दिलेल्या माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करून त्याची माहिती काढून आरोपी नामे राजू नारायण भोसले वय ३२ वर्षे राहणार वाहीरा ता.आष्टी जि.बीड. सध्या राहणार राशीन ता.कर्जत जि.अहमदनगर यास मांडवगण फराटा, गारमळा फाटा ता.शिरूर येथून ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपी हा सराईत अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी अहमदनगर जिल्हयात खुनासह दरोडा, आर्म अॅक्ट यासारखे गंभीर ४ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, प्रविण मोरे यांनी केलेली आहे.

आरोपीस पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून पुढील अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे हे करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा