१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला दुबईत अटक

दुबई : वृत्तसंस्था – १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीसह अन्य एका आरोपीला दुबईत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला अबू बकर हा मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाची आखणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी एक होता. अबू बकर याच्या विरोधात १९९७ साली रेड कॉर्नर नोटीस जारी झाले होते. तेव्हापासूनच तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता.अबू बकरला करण्यात आलेली अटक हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू बकर हा दुबईत रहात आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. अबू बकरचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख असे आहे. तो मोहम्मद आणि मुस्तफा डोसासोबत तस्करीमध्ये सहभागी होता. अबू बकर याने सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आखाती देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली होती. तसेच मुंबईत आरडीएक्स आणण्यामध्ये आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईतील घरात शिजलेल्या बॉम्बस्‍फोटाच्या कटामध्ये अबू सहभागी होता. त्‍याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतले होते.

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत बॉम्‍बस्‍फोट झाला होता. त्‍यात २५७ जणांचा मृत्‍यू झाला होता तर साडेसातशेहून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम अद्याप फरार आहे. या प्रकरणाती अन्य एक आरोपी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली असून, मुस्तफा डोसा याचा २०१७ साली मृत्यू झाला होता.