धक्कादायक ! ज्या साडीचा ‘पदर’ धरुन चालली ‘त्या’च ‘साडी’नं घेतला जीव, 3 वर्षाच्या मुलीला आईनेच दिला ‘गळफास’

वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन – वाशीममध्ये घडलेल्या घटनेमुळे ‘माता न तू वैरिणी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या साडीचा पदर धरून पोटची मुलगी चालायला लागली त्याच साडीने आईने आपल्या तीन वर्षाच्या पोटच्या मुलीला गळफास देऊन तिचे आयुष्य संपवले. मन सुन्न करणारी ही घटना मंगरुळपिर तालुक्यातील जनुना शिवारात घडली. केवळ पतीने स्वयंपाकाविषयी विचारल्याच्या रागातून तिने हे कृत्य केले. तनिक्षा भगत (वय-3 वर्षे) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील जुनना गावातील अमोल भगत आणि गायत्री भगत या दाम्पत्याला तीन मुली आहेत. सर्वात मोठी समीक्षा (वय-8), तनीक्षा (वय-3) आणि प्रांजली (वय-2) अशी त्यांची नावे आहेत. आज (मंगळवार) जिल्हा परिषदेसाठी मतदान होत असल्याने गायत्रीचा पती अमोल याला मतदानासाठी जायचे होते. त्याने गायत्रीला स्वयंपाकाविषयी विचारले. याचा तिला राग आला.

पतिचा राग मनात ठेवून तिने मधली मुलगी तनिक्षाला सोबत घेऊन मतदानाला जाते असे सांगून घरातून निघाली. गावाबाहेर गेल्यानंतर या निर्दयी मातेने आपला राग लेकीवर काढला. रस्त्यालगत असलेल्या एका झाडाला तिने पोटच्या मुलीला साडीने गळफास दिला. गळफास देऊन मुलीचा मृत्यू होईपर्यंत ती तिथेच उभी राहिली. काही क्षणात तीन वर्षाच्या तनिक्षाचा तडफडून जीव गेला. तनिक्षाचा जीव गेल्यानंतर गायत्री भानावर आली. आपल्या हातून घेडलेले हे कृत्याची तिला जाणीव झाल्यानंतर तिच्या पाया खालची जमीन सकरली. गायत्रिने देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी गावकरी धावून आल्याने तिचा आत्महत्येचा प्रयत्न फसला.

केवळ पतीने स्वयंपाकाबद्दल विचारल्याने त्याचा राग तीन वर्षाच्या मुलीवर काढला. गायत्री अधून मधून मानसिक रोगी असल्यासारखे वागत असल्याची चर्चा गावात आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मंगरुळपिर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/