बीड : कासारी येथील तलावात बुडून माय-लेकाचा मृत्यू

बीड (धारूर) : पोलीसनामा ऑनलाइन – दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या माय-लेकरांचा तलावात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाला. ही घटना आज (रविवार) दुपारी धारुर तालुक्यातील कासारी (बोडखा) येथे घडली. शितल कल्याण बडे (वय-37) आणि ओमकार कल्याण बडे (वय-14) अशी मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

कासारी (बोडखा) येथील शितल बडे या दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी मुलगा ओमकारसह तलावावर गेल्या होत्या. शितल या धुणे धुत असताना मुलगा ओमकार खेळताना त्याचा तोल गेल्याने पाण्यात पडला. मुलगा पाण्यात पडल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी शितल यांनी पाण्यात उडी मारली. त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या आणखी एका तरुणाने पाण्यात उडी मारली. हा प्रकार लक्षात येताच तलावावर असलेल्या इतर नागरिकांनी दुसऱ्या मुलाला वाचवले.

दरम्यान, दुसऱ्या मुलाला वाचवत असताना मोठा मुलगा ओमकार आणि शितल बडे हे पाण्यात बुडाले. त्या दोघांना पाण्याबाहेर काढले. मात्र, त्यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत ओमकार हा इयत्ता 9 वी च्या वर्गात शिकत होता. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Visit : policenama.com