पुण्याच्या वाघोलीत दुर्देवी घटना ! आई-मुलासह तिघांचा तलावात बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली येथील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या तळ्यात आई-मुलासह तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

रोहिणी संजय पाटोळे (40), स्वप्नील संजय पाटोळे (12) आणि दत्तात्रय रंघुनाथ जाधव (42, रा. वाघोली गावठाण) असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी आणि त्यांचा मुलगा स्वप्नील हे कपडे धुण्यासाठी मंदिराजवळील तळ्यात गेले होते. त्यावेळी मुलगा स्वप्नील पोहण्यासाठी तळ्यात उतरला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, स्वप्नील पाण्यात बुडत असल्याचे पाहून आई रोहिणी यांनी तळ्यात त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. मात्र ते दोघेही बुडू लागले. यामुळे या दोघांना वाचवण्यासाठी जाधव यांनी तळ्यात उडी घेतली. मात्र तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोनिकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी वाघोली परिसरात पसरली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी तोबा गर्दी केली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –