विवाहीतेसह 18 महिन्याच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत मृतदेह सापडल्यानं ‘खळबळ’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – आई आणि 18 महिन्याचा बाळाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने जालना शहरात खळबळ उडाली आहे. स्वाती नानासाहेब ढाकणे (वय-24) आणि निखील बाळासाहेब ढाकणे (वय-18 महिने) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना बदनापूर तालुक्यातील अनवी परिसरात घडली आहे. सासरच्या लोकांनी खून केल्याचा आरोप मयत स्वातीच्या घरच्यांनी केला आहे. मात्र अद्याप मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

स्वाती आणि निखील यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. दरम्यान, जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने या ठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण होते. चंदनझीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.

आई आणि लहान बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या पती आणि इतर कुटुंबाची चौकशी करणार आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. चंदनझीरा पोलीस पुढील तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/