माता न तू वैरिणी : काम करीत नाही म्हणून दिले हिटरचे चटके 

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन – ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ‘ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण अशी आई कुणालाच नको असे म्हणायला लावणारी घटना पुण्यात घडली आहे. घरातील काम करीत नाही म्हणून आईने ११ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करून हिटरने चटके दिले. एवढेच नाही तर त्या मुलाला चौकात सोडून आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कात्रज येथे राहणाऱ्या एक महिलेने आपल्या मुलाला अमानुष मारहाण केली, त्याला हिटरचे चटके दिले आणि त्याला कात्रज चौकात सोडले. या प्रकरणी ३४ वर्षीय आईसह दोघांवर सिह्गड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका संघटनेमुळे प्रकरण आले उजेडात
संबंधित महिला आणि तिचा पती हे विभक्त राहतात. ही महिला मुलांना हिटरने चटके देते अशी माहिती  लहान मुलांविषयक काम करणाऱ्या शिवाजीनगर भागातील एका संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांकावर नोव्हेंबर महिन्यात आली . त्यानंतर संस्थेतील व्यक्तींनी सात डिसेंबरला मुलाची आणि त्याच्या वडिलांची भेट घेतली. तेव्हा या प्रकरणाबत माहिती मिळाली . या संस्थेकडून पोलीस ठाण्यात या महिलेबाबत फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

माता न तू वैरिणी
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आई या मुलाला आणि त्याच्या भावाला घरी घेऊन गेली होती. मात्र, ती मुलांकडून घरातील सर्व कामे करून घेत होती. काम न केल्यास त्यांना काठीने मारहाण करत होती. अनेकदा हिटरनेही चटके दिले आहेत. तसेच, मारण्याची धमकीही दिली होती. आरोपी महिला मुलांना उपाशी ठेवून घरात कोंडून ठेवत असे आणि स्वत: फिरायला बाहेर जात होती. हा संपूर्ण प्रकार चार नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत घडला आहे. सिंहगड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.