२३ मे रोजी मुलाचे नाव ‘नरेंद्र मोदी’ ठेवणार्‍या कुटुंबावर सामाजिक ‘प्रेशर’ ; मुलाचे नाव ‘मोहम्मद मोदी’ ठेवले

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यामध्ये एका मुस्लीम कुटुंबाने घरात जन्मलेल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेची चांगलीच चर्चा रंगली होती. अनेकांनी या मुस्लिम कुटुंबाचे कौतुकही केले. नरेंद्र मोदींबद्दलच्या प्रेमापोटी त्यांनी पंतप्रधानांच्या नावावरुन मुलाचे नामकरण केले होते. आता या कुटुंबाने मुलाचे नाव बदलून मोहम्मद अल्ताफ आलम मोदी ठेवले आहे. सामाजिक दबावामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागल्याचे बोलले जात आहे.

आता या मुलाच्या जन्म तारखेवरुनही वाद आहे. आधी या मुलाचा जन्म २३ मे लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी झाल्याचे सांगण्यात आले होते. मुलाचे नाव बदलण्यासाठी या कुटुंबावर सामाजिक दबाव होता. मुलाच्या जन्मानंतर विधी करण्यात आले. त्यामध्ये नावावर आक्षेप असल्यामुळे काही कुटुंबियांनी सहभागी होण्यास नकार दिला असे मुलाची आई मेहनाज बेगम यांनी सांगितले.

वाद आणखी वाढवायचा नसल्यामुळे त्यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या नावामध्ये अजूनही मोदी आहे. हे कुटुंब मोदींचे समर्थक आहे. माझ्या सूनेने देशाच्या पंतप्रधानांच्या नावावरुन मुलाचे नाव ठेवले त्याचा मला अभिमान आहे असे आजोबा सुरुवातीला म्हणाले होते. मुलाच्या आईने त्याचा जन्म २३ मे लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी झाल्याचे सांगितले. स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाचा जन्म १२ मे रोजी झाल्याचे सांगितले. लोकप्रियता मिळवण्यासाठी मुलाच्या आईने जन्मतारीख बदलून २३ मे केली असा आरोपही रुग्णालयाने केला.