पुण्यातील खळबळजनक घटना : ३ मुलांना गळफास देऊन आईची आत्महत्या

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पुण्यातील भोसरी येथे घडली आहे. आईने दोन मुली आणि एका मुलाला घरातील एकाच हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास दिल्यानंतर घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन आईने ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे भोसरीसह पुण्यात खळबळ उडाली असून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फातिमा अक्रम बागवान (वय-२८) असे या महिलेचं नाव आहे. अलफिया अक्रम बागवान (वय ९), झोया अक्रम बागवान (वय ७), मुलगा जिआन अक्रम बागवान (वय ६) या तिघांनाही नायलॉन दोरीने गळफास लावला. त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली.

बागवान परिवार चार दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे येथून भोसरी येथील नूर मोहल्ला या ठिकाणी राहण्यास आले होते. हे कुटुंब मुळचे कर्नाटकातील असून मयत फातिमाचा पती अक्रम बागवान हा फळविक्रीचा व्यवासाय करत होता. मात्र, सध्या तो बेरोजगार असून त्याला काम शोधण्यासाठी फातिमाने आज सकाळी दहाच्या सुमारास बाहेर जाण्यास सांगितले. दुपारी चारच्या सुमारास अक्रम घरी आला. त्याने दरवाजा वाजवला मात्र घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

अक्रमने भोसरी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घराचा दरवाजा तोडला असता समोरील दृष्य पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. छताच्या एकाच हुकाला तिनही मुलांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर शेजारच्या खोलीत फातिमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली.

घटना समजता परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेत असताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. पोलिसांनी मृतदेह पिंपीर येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन गेले. बागवान परिवाराचे नातेवाईक बाहेरगावी रहात असल्याने ते आल्यानंतरच खरे कारण समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त