Pune : पाटसमध्ये घरात आढळला आई-मुलाचा मृतदेह, हत्या असल्याचा कुटुंबातील व्यक्तीचा संशय

पाटस : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील पाटस येथे राहत्या घरामध्ये आईसह सात वर्षाच्या मुलाचा छताला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि.27) सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे. लिना सचिन सोनवणे (वय-35) व ओम सचिन सोनवणे (वय-7 रा. स्वराज व्हॅली, पाटस, ता. दौंड) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत आढळून आले आहेत. ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांना आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी भाऊसाहेब शेलार यांनी फिर्याद दिली आहे. शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,की माझी बहिण लीना सोनवणे तिच्या दोन मुलांसह पाटस येथील स्वराज व्हॅली या अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिची मुलगी वैष्णवी सचिन सोनवणे हिचा आम्हाला फोन आला होता की आई व तिचा भाऊ ओम हे दोघेजण छताच्या पंख्याला लटकत आहेत. तेव्हा आम्ही पाटस येथे जाऊन पाहिले. त्यावेळी भाचा ओम हा बेडरुमधील छाताच्या पंख्याला ओढणीने लटकलेल्या स्थितीत होता. तर बहीण लीना ही किचनमध्ये छताच्या पंख्याला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळून आली.

या घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ही हत्या आहे असा संशय कुटुंबातील व्यक्तींनी घेतला आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर हे स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.