Pimpri : भरधाव मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने मायलेकीचा मृत्यू, सांगवीतील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  –   सांगवी येथे भरधाव वेगातील मोटारीने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील मायलेकीचा मृत्यू झाला. सुनीता कपिल ऊर्फ कपिलकुमार अगरवाल (वय 48, रा. प्रियदर्शनीनगर, लेन क्रमांक 3, जुनी सांगवी ) आणि त्यांची मुलगी रूपाली (वय 23) अशी अपघातातील मृत्यू झालेल्या मायलेकीची नावे आहेत.

मोटारचालक आकाश विनायक गायकवाड (वय 27, रा. महात्मा फुलेनगर मराठी शाळेमागे, दापोडी) याला सांगवी पोलिसांनी अटक केलीय.

याप्रकरणी कपिल ऊर्फ कपिलकुमार गिरीधरीलाल अगरवाल यांनी फिर्याद दिलीय.

याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी यांच्या पत्नी सुनीता आणि मुलगी रूपाली ह्या शुक्रवारी (दि. 4) दुपारी साडेतीनच्या सुमारास दापोडीकडून जुनी सांगवीच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच 12, आरएच 3380) जात होत्या. तर, आरोपी आकाश गायकवाड हा त्याच्या मोटारीतून (एमएच 14, सीएच 3414) सांगवीकडून दापोडीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता.

त्यावेळी दापोडी ते जुनी सांगवी या मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ आरोपीने अगरवाल यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात सुनीता आणि त्यांची मुलगी रूपाली या दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मोटारचालक आकाश गायकवाड याला पोलिसांनी अटक केलीय. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

You might also like