‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचं हिंदुत्व नाही ; उद्धव ठाकरेंचा भाजपावर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांवर जोरदार शरसंधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह राज्यातील भाजपा नेत्यांना त्यांनी नाव न घेता लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी मंदिरे खुली करण्याच्या निर्णयावरून राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पत्रातून चांगलाच वाद रंगला होता. आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे यांनी नाव न घेता राज्यपालांवर निशाणा साधला.

येथे गाय म्हणजे माता आणि…
उद्धव ठाकरे म्हणाले, माय मरो आणि गाय जगो, हे आमचे हिंदुत्व नाही. आज महिलांवर अत्याचार होत आहेत, हत्या होत आहेत. महाराष्ट्रात तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का नाही? मी विधानसभेत म्हटले होते की येथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता.

तेव्हा शेपूट घालून बिळात लपले होते का ?
ठाकरे पुढे म्हणाले, आम्हाला हिंदुत्वाबद्दल काय विचारताय? ज्यावेळी बाबरी पाडली त्यानंतर देशात जो हलकल्लोळ माजला होता, तेव्हा कोणाची हिंमत झाली नाही. आता आम्हाला हिंदुत्वावर प्रश्न विचारत आहेत, ते त्यावेळी शेपूट घालून बिळात लपले होते का, काही कल्पना नाही. कदाचित त्या वेळेला ज्यांचे नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हते, ते आम्हाला विचारत आहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले? तुम्ही अचानक सेक्युलर झालात?

थाळ्या बडवणे हे शिवसेनेचे हिंदूत्व नव्हे
राज्यपाल कोश्यारींचे नाव न घेता घणाघती टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवले. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरे काय येतं? मला अतिरेक्यांना बडवणारे हिंदुत्व हवे आहे. नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचे हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांट उड्या, दोरीच्या उड्या मारणारे हे कसले हिंदुत्व. आमचे हिंदुत्व हे नव्हे, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपावर केलेल्या जोरदार टीकेमुळे हा मेळावा चांगलाच गाजला आहे. याचे पडसाद आता राजकीय क्षेत्रात उमटण्यास सुरू होणार आहे. यंदा कोरोनामुळे शिवसेनाचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर न होता, मुंबईतील सावरकर स्मारकात पन्नास मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता.