Maharashtra : ‘कोरोना’मुळे मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने मातेनं सोडले प्राण; काही मिनिटांच्या अंतराने माय-लेकराचा मृत्यू

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन टीम – मागील दोन महिन्यापासून राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष, मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमवावे लागले आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच घरी आईने देखील आपले प्राण सोडला. या घटनेमुळे परिसरात आणि तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उस्मानाबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या हिंगळजवाडी येथील रमाकांत मधुकर नाईकनवरे (वय-50) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचार सुरु असल्याने ते ठणठणीत बरे होऊन घरी परततील अशी आशा कुटुंबातील लोकांना होती. मात्र गुरुवारी सकाळी अचानक रमाकांत यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. ही बातमी घरात असलेल्या 70 वर्षीय आई सुशिला मधुकर नाईकनवरे यांना समजली. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

एकिकडे कोरोनामुळे रमाकांत यांचे निधन झाल्याने दु:खात असलेल्या कुटुंबाला 70 वर्षीय आईचाही मृत्यू झाल्याचे समजले. काही मिनिटांच्या अंतराने माय-लेकराने या जगाचा निरोप घेतल्याने नाईकनवरे आणि गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. हिंगळजवाडी येथील शेतात एकाच वेळी या माय-लेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.