… अन् पोलीस अधिकारी लेकाचा मृतदेह पाहून ‘माय’ माऊलीनेही सोडले प्राण

किशनगंज (बिहार) : पोलीसनामा ऑनलाइन – बिहारमधील पोलीस अधिकारी अश्विनी कुमार यांची पश्चिम बंगालमध्ये हिंसक जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली. शहीद अश्विनी कुमार याचा मृतदेह जेंव्हा त्यांच्या घरी आणण्यात आला. तेंव्हा त्यांच्या आईला ते दृश्य पाहण शक्य झाले नाही. मुलाच्या हत्येचे दुःख सहन न झाल्याने त्यांच्या आईनेही प्राण सोडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माय -लेकरांच्या मृतेदहावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद अश्विनी कुमार बिहारमधील किशनगंज शहर ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. एका लुटमारीच्या प्रकरणात ते छापेमारीसाठी पश्चिम बंगालमधील दिनाजपूर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचे एक विशेष पथकही होते. दरम्यान हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. अश्विनी कुमार यांच्या हत्येबाबत कुटूंबियात प्रचंड नाराजी आहे. कट रचल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा आरोप परिवाराने केला आहे. अश्विनी कुमार हे पोलीस पथकासह तिथे गेले होते. त्याठिकाणी पोलीस अधिकारी, पोलीस दल उपस्थित असताना त्यांनी एक गोळी झाडली असती तर अश्विनी कुमार गर्दीच्या तावडीतून वाचले असते असे कुटुंबियांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सर्कल इन्स्पेक्टर मनीष कुमार यांच्यासह 7 पोलिसांना निलंबित केले आहे. जमावाने अश्विनी कुमार यांना घेराव घातला असता हे पोलीस तेथून माघार घेत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. दरम्यान अश्वनी कुमार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघाना अटक केली आहे.