कौतुकास्पद ! पंढरपूरात आईनं सोडलं ‘तान्हं’ लेकरु, मुलीसाठी ‘खाकी’ वर्दी झाली ‘माय-माऊली’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दोन महिन्याच्या तान्ह्या मुलीला आईने सोडून दिले. परंतु या परक्या मुलीला खाकी वर्दीने माया दिली. गुरुवारी दुपारी ही हृदयस्पर्शी घटना पंढरपुरात घडली, ज्याची चर्चा पंढरपूरात दिवसभर होती.

पंढरपूरात चौफाळा चौकातील कृष्णाच्या मंदिराजवळ दुपारच्या वेळेस एक अज्ञात महिला दोन महिन्याच्या चिमुकलीला घेऊन बराच वेळ बसली होती. परंतु त्याठिकाणी बसलेल्या सचिन व्यवहारे, मनोज वाडेकर व धैर्यशील काळे यांना या महिलेने लघुशंकेला जाऊन येते असे सांगून मुलीला थोडावेळ सांभाळा म्हणून निघून गेली. परंतु बराच वेळ निघून गेला महिला लहान मुलीला घेण्यास परतली नाही.

यानंतर तिघांनी या चिमुकल्या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या मुलीला पोलीस कॉन्टेबल सोनाली इंगोले, पौर्णिमा हादगे, प्रियांका मोहिते यांनी नवे कपडे घालून बाटलीने दूध पाजून शांत केले. या चिमुरडीला सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी खेळवले देखील. बाटलीने दूध पाजल्यानंतर चिमुरडीच्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्यामुळे ज्याचं कोणी नाही त्याचे पोलीस आहेत असा संदेश जनमानसात दिसून आला.

या घटनेनंतर या अज्ञात महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात कलम 317 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या चिमुकलीला नवरंगे बालकाश्रमात दाखल करण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/