धक्कादायक ! पती-पत्नीमध्ये अमेरिकेला जाण्यावरून ‘अडलं’, आईकडून 6 वर्षाच्या मुलीचा हाताच्या नसा कापून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवरा बायको यांच्यात अमेरिकेला जाण्यावरून झालेला वाद 6 वर्षाच्या मुलीच्या जीवावर बेतला आहे. आई-वडिलांच्या वादातून आईने स्वतःच्या मुलीचा हाताच्या नसा कापून खून केला. ही धक्कादायक घटना आज (सोमवार) दुपारी पावणे एकच्या मार्केट यार्ड परिसरातील अरविंद अपार्टमेंटमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अक्षरा अमित पाटील (वय-6) असे खून करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे.

याप्रकरणी श्वेता अमित पाटील (वय-36) या महिलेवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संतोष पाटील यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता पाटील आणि त्यांच्या पतीमध्ये काही दिवासांपासून वाद सुरु होते. तिचे शिक्षण बी कॉम पर्य़ंत झाले असून ती मनोरुग्ण असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पती-पत्नीमध्ये अमेरिकेला जाण्यावरून वाद होत होते.

पतीसोबत अमेरिकेला जाण्यास श्वेताचा विरोध होता. हा वाद सोडवण्यासाठी ते त्यांचे काका रहात असलेल्या अरविंद अपार्टमेंट येथे गेले. या ठिकाणी झालेल्या वादातून श्वेताने रागाच्या भरात अक्षरा हिला स्वयंपाकघरात नेऊन आतून कडी लावली. त्यानंतर तिने टोकदार चाकूने अक्षरा हिच्या दोन्ही हाताच्या नसा कापल्या. घरातील लोकांनी तिला आवाज दिला मात्र, तिने दरवाजा उघडला नाही. अखेर पोलिसांची भिती घातल्यावर तिने दार उघडले. तेव्हा तिच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. तर अक्षरा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. तिला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र सहाणे करीत आहेत.