Nagpur News : धक्कादायक ! प्रसूतीदरम्यान बाळ दगावलं, निर्दयी मातेनं चक्क शव कागदात ठेवून पलायन केलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसूतीदरम्यान बाळ दगावल्याने चिमुकल्याचे शव कागदात ठेवून निर्दयी मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे. शुक्रवारी (दि. 5) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील मेडिकल कॅज्युअल्टीजवळ ही घटना उघडकीस आली. पोलीस त्या मातेचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील मेडिकलच्या कॅज्युअल्टीजवळ मध्यरात्री एक महिला प्रसूत झाली. मात्र मातृत्वाचा आनंद अनुभवण्यापूर्वीच बाळ दगावल्याचे समजले. त्यामुळे चिमुकल्या बाळाचे शव कागदात ठेवून ती माता पसार झाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका वाहनचालकाला कागदात ठेवलेले बाळाचे शव दिसून आले. त्यांनी तातडीने मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना खबर दिली. त्यांनी त्या नवजात बाळाला बघितले. जिवंत आहे की, मृत याची तपासणी केली. बाळ मृत असल्याचे समजताच पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून बाळाला सोडून गेलेल्या मातेचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.