धक्कादायक ! ८ महिन्यांच्या बाळासह आईने घेतला गळफास

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – आठ महिन्याच्या मुलासह आईने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील आदिवासी ग्राम नवी गुमठी येथे उघडकीस आली.

गुमठी येथील शिकराबाई दारासिंग चव्हाण (वय १९) या विवाहितेने आपल्या आठ महिन्याचा चिमुकला देवेंद्र दारासिंग चव्हाण याच्यासह गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कामोद शिवार अंबाबरवा अभयारण्यातील पिंगळी बिट कंपार्टमेंट नं. ४५४ सोनाळा रेंजमध्ये उघडकीस आली.

या महिलेचा पती दारासिंग चव्हाण (वय २१, रा. नवी गुंमठी) यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. शनिवारी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान शेती कामावरून लहान भाऊ आणि मी घरी परतल्यावर घराला कुलूप लावल्याचे दिसून आले. गावात विचारपूस केल्यावर पत्नी लहान बाळाला घेऊन घरातून गायब असल्याचे निदर्शनास आले. नातेवाईक व इतर ठिकाणी रात्री शोध घेतला असता तिचा शोध लागला नाही.

रविवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता सकाळी सात वाजताच्या दरम्यान अभयारण्यातील एका झाडाला मुलासह गळफास घेऊन आढळून आले.

You might also like