पिंपरी पोलिसांनी आवळल्या ड्रग्ज माफियांच्या मुसक्या; 20 जणांना अटक, मेफेड्रोन बनविण्यासाठी गुजरातमध्ये हलविले ‘बस्तान’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मेफेड्रोन प्रकरणामध्ये मोठी कारवाई करून 20 आरोपींना अटक केलीय. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये हि माहिती दिलीय.

मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज या अमली पदार्थांच्या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन उघड होत असतानाच त्याचे धागेदोरे बॉलीवुड तसेच बड्या धेंडांपर्यंत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रांजणगाव इथल्या कंपनीमध्ये छापा टाकल्यानंतर आरोपींनी गुजरातला बस्तान हलविले. मेफेड्रोन तयार करण्यातसाठी गुजरात येथे आरोपी कंपनी सुरू करणार होते, असे समजले आहे.

कृष्ण प्रकाश यांनी सांगिले की, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मेफेड्रोन प्रकरणामध्ये मोठी कारवाई करून 20 आरोपींना अटक केली. आरोपी यांनी रांजणगाव येथील बंद कंपनीमध्ये 132 किलो मेफेड्रोन बनविले. त्यातील 112 किलो ड्रग्ज तुषार काळे याने नायजेरियन आरोपी झुबी उडोको याला विक्री केलीय. शिल्लक 20 किलो ड्रग्ज अक्षय काळे विक्रीसाठी घेऊन जात होता. त्यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रस्त्यावर सापळा लावून आरोपींना अटक केली.

या आरोपींमध्ये झुबी इफनेयी उडोको या नायजेरियनचाही समावेश आहे. झुबी एका अमली पदार्थांच्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहामध्ये दहा वर्ष शिक्षा भोगून आलाय.

अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्याशी संबंधित अमली पदार्थांच्या एका प्रकरणामध्ये राकेश खानिवडेकर हा साक्षीदार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात तो आरोपी असल्याचे निष्पन्न झालंय. आरोपी तुषार सूर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण आठ गुन्हे दाखल असून त्याचा मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे, असे समजले आहे.

ड्रग्ज बनविण्यासाठी तुषार काळे आणि राकेश याने महाड एमआयडीसीतील एक कंपनी तसेच कर्जत डोंगरगाव येथील एका फार्म हाऊसमध्ये प्रशिक्षण घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक गिरीष चामले, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनील कानगुडे, सावन राठोड, निशांत काळे, अशिष बोटके, शकुर तांबोळी, संदीप पाटिल, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठ्ठल सानप, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केलीय.