‘त्यांना’ धडा शिकविण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांचे पाईप तोडून आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकवासला येथील पाणी पुरवठा विभागाचे पंप बंद करून पुणेकरांचे तोंडचे पाणी पळविणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवनला पाणी पुरवठा करणारे पाईप तोडून आंदोलन केले.

जलसंपदा विभागाने बुधवारी खडकवासला धरण येथे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे पंप पोलीस बंदोबस्तात बंद केले. यामुळे पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशालाही जलसंपदा विभागाने केराची टोपली दाखवली आहे. पाणी पुरवठा खंडित करण्याच्या जल संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते मंगळवार पेठेतील जल संपदा विभागाच्या सिंचन भवन येथे पोहोचले. या भवनातील पाणी पुरवठा करणारे पाईप कार्यकर्त्यांनी तोडुन टाकले. यासंदर्भात मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले कि, पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात महापालिका आणि जलसंपदा यांना अपयश आले. पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या विरुद्ध कोणतेही निर्बंध न पाळता आंदोलन केले जाईल.