भात पीकाच्या पंचनाम्यात ‘हलगर्जीपणा’, प्रशासनाविरूध्द तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) – भात कापणी चालू असतांना अचानक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला असतांना सुध्दा शेतकऱ्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव, भरत दळवी, उल्हास बांगर, चेतनसिह पवार, रवींद्र चंदने यांनी निवेदन देऊन सुद्धा वेळीच पंचनामे होत नाहीत हे निदर्शनास येताच या सामाजिक कार्यकर्त्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

या आंदोलनात संपुर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, सन २०१६/१७ ची नुकसान भरपाई वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मिळावी, पीक कर्ज माफी व्हावी, सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या आहेत. २३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी २०१९ च्या ऐनवेळी आलेल्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन नुकसानीचे सर्व्हे करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही गावागावात याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहायक व प्रशासन यांच्याविरुद्ध आज मुरबाडमध्ये तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी राजाचे पीक ऐन निवडणुकीत पाण्यात भिजत असतांना सुद्धा कोणताही विचार न करता मतदानाचा हक्क बजावला मात्र निवडणूका होऊन सुध्दा काही दिवस गेले पण कुठला कार्यकर्ता आमदार, खासदार, पुढारी शेतकऱ्याच्या शेताची पडझड पाहण्यास न आल्याने शेतकऱ्यावर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ अली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हेच कार्यकर्ते विनवणी करणारे ऐन वेळी शेतकऱ्याकडे पाठ फिरवतील असे स्वप्नात ही वाटले नव्हते. आत्ता आपल्या भात नुकसानीचे पंचनामे होतील का ? नुकसान भरपाई मिळेल का ? यांची काळजी लागली असतांना मुरबाड मधील अखेर सामाजिक कार्यर्त्यांनी आंदोलन छेडले.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव, भरत दळवी, विष्णू चौधरी, कचरू म्हारसे, बाळू हरड, शिवसेना मुरबाड शहरप्रमुख राम दुधाले, रत्नाकर आलम, सुधाकर शेळके व तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठया संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार बंडू जाधव, तालुका कृषी अधिकारी विश्वे यांना निवेदन सादर केले. त्यांनी आंदोलनकर्त्याच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Visit : Policenama.com