धनगर समाजाचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्यावतीने आज नगर-मनमाड महामार्गावर राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक तब्बल एक तास खोळंबली होती.

या आंदोलनादरम्यान बोलताना आंदोलक म्हणाले की, धनगर समाजाच्या घटनात्मक अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्थापित सरकारने सत्तेवर येताच धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे खोटे आश्वासन दिले. समाजाची दिशाभूल केली. म्हणून सरकारला दिलेल्या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी व आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी विठ्ठलाच्या चरणी साकडे घालून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धनगर बांधव पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहेत. त्याचबरोबर
न्याय हक्काची न्यायालयीन लढाई न्यायालयात चालू आहे. परंतु, दबाव तंत्राची लढाई ही रस्त्यावर मैदानावर लढावीच लागते म्हणून त्या पार्श्वभूमीवर उपोषणाला बसलेल्या धनगर बांधवांना पाठिंबा देण्यासाठी व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्फुर्ती दिनानिमित्त आज राहूरी येथे नगर-मनमाड हायवेवर 1 तास रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी अनेक धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजाच्यावतीने राहुरीचे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नगर-मनमाड रस्त्यावर झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

आरोग्यविषयक वृत्त