विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरणमधील कंत्राटी कामगारांचे प्रश्नाबाबत सरकारकडे वारंवार विनंती, अर्ज, प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतरही दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधीसह हजारो कामगार उपस्थित होते.

कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशा नुसार वीज कंपनीतील भरतीमध्ये वयोमर्यादेत देखील वाढ करावी. विद्युत सहाय्यक ही भरती SSC च्या मार्क मेरिट नुसार न लावता ITI वीजतंत्री व तारतंत्रीच्या मेरिट नुसार करावी. कोरोना काळात शहीद झालेल्या 26 कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या वारसाला नोकरी मिळावी, कामगार कपातीचे धोरण रद्द करून आज कार्यरत अनुभवी कंत्राटी कामगाराचा रोजगार जाणार नाही याची ऊर्जामंत्री व प्रशासनाने लिखित खात्री द्यावी. कंत्राटदारांच्या चौकशा व्हाव्यात या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऊर्जा उपसचिव वाळुंज यांनी आज संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यामध्ये कामगार महासंघाचे मार्गदर्शक अण्णा देसाई, अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री राहुल बोडके, उपाध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते. या वेळी लवकरच मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करून कंत्राटी कामगारांचे मागण्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

महाराष्ट्रातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाबतीत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेला राज्यव्यापी आंदोलन करावं लागेल, असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ ) अध्यक्ष नीलेश खरात यांनी आझाद मैदानावर झालेल्या आंदोलन प्रसंगी दिला आहे.