राष्ट्रवादीला मोठा धक्का ! आ. दिलीप सोपल आणि युवा नेत्या रश्मी बागल शिवसेनेच्या वाटेवर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपा-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. असे असताना सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेत्या रश्मी बागल आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. दिलीप सोपल यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारून कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. बैठकीला दांडी मारल्याने दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.

माढा-करमाळा विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा रश्मी बागल यांचा इरादा आहे. त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून येत्या सोमवारी त्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, रश्मी बागल या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

तर दुसरीकडे बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा तालुक्यात आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबई येथे बैठक होती. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे धोरण ठरविण्यात येणार होते. मात्र, या बैठीला दिलीप सोपल यांनी दांडी मारली. बार्शीचे माजी आमदार राजा राऊत भाजपामध्ये असल्याने दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे बार्शी विधानसभा मतदार संघामध्ये तिकीटावरून युतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का
दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवलेले संजय मामा शिंदे आणि त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे देखील भाजपाच्या वाटेवर आहेत. माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा गट भाजपामध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची सोलापूर जिल्ह्यातील ताकत कमालीची खालावली आहेत. त्यातच दिलीप सोपल यांनी पक्ष सोडला तर सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादीने मुंबई येथे बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला सोपल यांनी दांडी मारली.

आरोग्यविषयक वृत्त