मोदींवरील पुस्तकावरून खा. डॉ. कोल्हेंचा संताप, म्हणाले – ‘…तर भस्मसात व्हाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केल्यामुळे राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून, राजकीय नेत्यांकडून, सर्वसामान्य जनतेकडून आणि एकंदरीतच शिवभक्तांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. या वादावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या पुस्तकाच्या प्रकाशनावर सडकून टीका केली आहे. तसेच, या पुस्तकाचा उल्लेक करताना, एखाद्या बाजारू लांगूलचालन पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

दरम्यान काल भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयातून या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक अतिशय वादात सापडले असून या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आल्यानं भाजपावर सर्वच क्षेत्रातून सडकून टीका केली जात आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर मनसेनेही इशारा दिला आहे. दरम्यान या पुस्तकावर आमदार शिवेंद्रराजे अन् छत्रपती संभाजीराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. उदयनराजे देखील आपली भूमिका मांडणार आहेत आता अमोल कोल्हे यांनी देखील फेसबुकवरून आपली भूमिका मांडत संताप व्यक्त केला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, ”एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही परंतु ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल !, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे! ते एकमेवाद्वितीय आहेत…. कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही.. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे…याचं भान ठेवा … नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल!” असे खडतर भूमिका मांडून मोदींची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होऊच शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/