Amravati News : राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी, माजी खासदार अडसूळ यांची टीका

तिवसा : पोलीसनामा ऑनलाईन – बडनेराचे आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी असल्याची टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. आ. राणा यांनी काही दिवसांपूर्वी अडसूळविरोधात ईडी कार्यालयात कागदपत्रे सादर करून चौकशीची मागणी केली होती. त्यावर आता माजी खासदार अडसूळ यांनी उत्तर दिले आहे.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी राणा दाम्पत्यांनी केली होती. यासंदर्भात अडसूळ म्हणाले की, सिटी को-ऑप बँकेत घोटाळा झाला. त्याबाबत मी स्वतः तक्रार केली असून त्याच्या सर्व चौकशीसाठी मी समोर जाण्यास तयार आहे.

अडसूळ म्हणाले की, ज्यावेळी राणा दाम्पत्यांच्या अंगाशी काही गोष्टी येतात तेव्हा दुसऱ्याला कस बदनाम करता येईल हाच प्रयत्न ते करतात. त्यांच्या जातप्रणाणपत्राचे प्रकरण आपल्याविरोधात जाणार याची कल्पना त्यांना आहे. तसेच निवडणुकीमध्ये जास्त प्रमाणात केलेला खर्च हा नियमबाह्य आहे. त्यामुळे आमदारकी सुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे खासदारकी व आमदारकी जाणार या भीतीने ते चलबिचल झाले आहेत, असा आरोप अडसूळ यांनी केला आहे.