‘कमलनाथ हे तर कलंकनाथ आणि राक्षस’, ‘आयटम’ वक्तव्यावरुन इमरती देवी भडकल्या

भोपाळ : वृत्तसंस्था –   मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यावरुन राजकारण तापलं असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कमलनाथ हे तर कलंकनाथ आहेत. मी त्यांना राक्षस समजते अशी टीका त्यांनी केली. एका प्रचार सभेत कमलनाथ यांनी ‘आयटम’ असा उल्लेख केल्याने मध्य प्रदेशात वादळ निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौन आंदोलन करत याचा निषेध केला आहे.

इमरती देवी म्हणाल्या, कधी काळी कमलनाथ यांना मी मोठा भाऊ मनात होते. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझा अपमान केला होता. ते मुख्यमंत्री असताना आम्ही भेटायला गेल्यानंतर ते सगळ्यांना फटकारत असतं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत काहीही विकास केला नाही. मुख्यमंत्री पद गेल्याने कमलनाथ यांना वेड लागलं असून ते राज्यभर फिरत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

कमलनाथ यांचं स्पष्टीकरण

एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले, जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं.1. विधानसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते आयटम नं.1. आयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरलेला नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवलं नाही. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत.

ते पुढे म्हणले की, आयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. जर तुम्ही कुठला कार्यक्रम पाहत असाल तर त्यातही आज माझा आयटम नंबर वन ओमकारेश्वर आहे, असा उल्लेख असतो. मग हे काय अपमान करणारे आहे का. मला असं वाटत नाही. कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे.