मुंबईतील हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये अधिकारी अन् माजी मंत्र्याचे नावामुळे खळबळ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये दादर नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांना ज्या रूममध्ये आत्महत्या केली तिथे एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये गुजरातचे अधिकारी आणि माजी मंत्र्याची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. एकामध्ये आणखी काही मजकूर लिहिला आहे पण तो गुजराती भाषेत असल्याने प्राथमिक तपासात अडचणी येत आहेत. डेलकर हे सात वेळा खासदार हाेते.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सी ग्रीन साउथ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील रूममध्ये मोहन डेलकर थांबले होते. त्यांच्या चालकाने सकाळी ११ वाजता फोन केला. मात्र, तो त्यांनी उचलला नाही. वारंवार फोन करूनही त्यांचा काही प्रतिसाद येत नसल्याने चालकाने डेलकर यांच्या कुटूंबियांना फोन केला. त्यानंतर कुटूंबियांनी तसेच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही कॉल केले. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रूमच्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान दुपारी १२च्या सुमारास याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, मरिन ड्राइव्ह पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर बाजूच्या विंगमधील पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारण्याचा डेलकर यांच्या चालकाने प्रयत्न केला. कित्येक प्रयत्नानंतर तो गॅलरीत उडी घेण्यात यशस्वी झाला. त्यावेळी डेलकर हे शालच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

मोहन डेलकर यांच्या मृतदेहाशेजारी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली. या नोटमध्ये गुजरातच्या काही बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते. मात्र, ही नावे नेमकी कोणाची आहेत याबाबत पोलिसांकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसाना मृतदेहाजवळ एक गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट सापडली. या नोटमध्ये गुजरातच्या काही बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते. याबाबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे. प्राथमिक तपासात तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनासाठी डेलकर यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असेही मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सांगितले.