‘इमरती देवी जिलेबी बनल्या’, पुन्हा एका कॉंग्रेस नेत्यांनी लगावला सणसणीत टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी डबरा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार इमरती देवी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. मात्र, या वादानंतरही मतदारांची इमरती देवींना सहानुभूती नाही. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान आता काँग्रेसने इमरती देवींवर (imarti-devi) निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते व माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा ( mp-congress-leader-sajjan-singh-verma) यांनी भाजपसह इमरती देवी यांच्यावर टीका केली आहे. जर इमरती देवी यांना ‘आयटम’ संबोधल्याने काँग्रेसचे नुकसान झाले असेल, तर मग त्यांचा निवडणुकीत पराभव का झाला? इमरती देवी जिलेबी बनल्या आहेत, असे सज्जन सिंह यांनी म्हटले आहे. पत्रकारांनी त्यांना माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या विधानामुळे मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले ? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना वर्मा यांनी असे विधान केले आहे.

इमरती देवी यांना त्यांचे व्याही सुरेश राजे यांनी पराभूत केले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या इमरती देवी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या इमरती देवी यांच्याविरोधात काँग्रेसने राजे यांना मैदानात उतरवले होते. या राजेंच्या प्रचारासाठी आले असताना कमलनाथ यांनी भाषणादरम्यान, इमरती देवी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, प्रत्यक्ष मतदानामध्ये या वादाचा मतदारांवर प्रभाव पडल्याचे दिसून आले नाही.

पोटनिवडणुकीत भाजपच्या इमरती देवी यांना 68 हजार 56 मते मिळाली, तर काँग्रेसच्या सुरेश राजे यांना 75 हजार 689 मते मिळाली. अशा प्रकारे सुरेश राजे यांनी इमरती देवी यांना 7 हजार 633 मतांनी पराभूत केले. इमरती देवी शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांना आता आपले मंत्रिपद सोडावे लागणार आहे.