रिव्हॉल्व्हर चालवण्याचं ‘ट्रेनिंग’ प्रत्येकाच पण ‘हिम्मत’ बोटावर माेजण्या इतक्याच पोलिस अधिकार्‍यांकडे : डॉ. सत्यपाल सिंह

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी पोलिसांना काठी आणि रिव्हॉल्व्हर दिली आहे. रिव्हॉल्वर चालवायचे ट्रेनिंग तर प्रत्येकाला दिलेले असते पण ती चालवायची हिंमत काही मोजक्या अधिकाऱ्यांकडेच असते. त्यामुळे त्यांचे सत्कार सोहळे झालेच पाहिजेत. तर आपल्या खालील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि विश्वास वाढविण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असा सल्ला माजी पोलीस आयुक्त आणि खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी आयपीएस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला .

‘एन्काऊंटर फेम’ सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव , पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांना नुकतेच राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले तसेच अपर पोलीस अधिक्षक सतिश देवरे सेवानिवृत्त झाल्याबद्दल राज जैन मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सत्यपाल सिंह उपस्थित होते. याप्रसंगी निवृत्त अधिकारी शेषराव सूर्यवंशी, राजेंद्र जोशी, भानुप्रताप बर्गे यांचाही सन्मान करण्यात आला. सूर्यवंशी आणि बर्गे यांनी आजकाल वरिष्ठांचा आपल्या सहकाऱ्यांवरील विश्वास कमी होत चालल्याने पोलीस दलात खाली काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असल्याची खंत यावेळी बोलून दाखवली. हा धागा पकडतच डॉ. सिंह यांनी आपल्या भाषणात काही उदाहरणे देत सूचना केल्या.

डॉ. सिंह म्हणाले, की पोलिस हे समाजचे खरे हिरो आहेत. समाजाच्या रक्षणासाठी ते काम करत असतात. आपल्या लोकशाही मध्ये पोलीस सेवेला अत्यंत उच्च स्थान आहे. परंतु इंग्रजानी तयार केलेल्या कायद्यांमुळे पोलिसांवर्षे भरोसा केला जात नाही हे दुर्दैव आहे.

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वरिष्ठांवरील विश्वास कमी होत चालला आहे, हे सत्य आहे. सहकाऱ्यांवर विश्वास नाही राहिला तर काम नाही होणार. काम करताना चुका होणारच आहेत. अशावेळी त्यांना वरिष्ठांनीच संरक्षण देण्याची गरज असते. जे काम करत नाहीत त्यांच्याकडून चुका होणारच नाहीत. माझ्या पुणे पोलीस आयुक्त पदाच्या काळात एका वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्याच्या दहाबारा सहकाऱ्यांविरोधात बलात्काराची तक्रार झाली होती. सर्व खातरजमा केली. अगदी न्यायालयापर्यंत तक्रारी झाल्या. पण मी जोपर्यंत आयुक्त असेल तोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिलो. उच्च न्यायालयातही प्रतिज्ञापत्र दिले. न्यायालयाने ती तक्रार काढून टाकली. असेच एका पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी मी अधिकाऱ्यांच्या पाठीशी कायम राहिल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

एन्काऊंटर करणारे जाधव, जोशी सारखे बोटावर मोजण्या एवढे अधिकारी पोलीस दलात आहेत. रिव्हॉल्व्हर चालवण्यासाठी हिम्मत असावी लागते. अशा अधिकाऱ्यांचा सत्कार नाही करायचा तर कोणाचा करायचा. ज्यावेळी असे सोहळे बंद होतील, तेंव्हा पोलिसिंग बंद होईल, असेही डॉ. सिंह यांनी नमूद केले. पोलिसिंग पेक्षा राजकारण कठीण आहे. पण मी पोलीस नसतो तर बागपत सारख्या मतदार संघात खासदार नसतो झालो. संसदेत मी सातत्याने पोलिसांचे प्रश्न उपस्थित करत असून पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी धनंजय जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात प्रत्येक वरीष्ठाने आपल्या खालील सहकाऱ्यांवर विश्वास दाखविल्यास चांगले काम होते, याबाबत त्यांची उदाहरणे देत मार्गदर्शन केले. निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर यांनी सूत्र संचालन केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी स्वागत केले. रामचंद्र जाधव यांचे चिरंजीव अमर जाधव यांनी आभार मानले.

आरोग्यविषयक वृत्त –