खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘या’ मुद्द्यावर फसविले, अभिनेत्री दीपाली सय्यदचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान खा. सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यावर मते मागितली. परंतु निवडणुकीनंतर त्यांनी हा विषय सोडून दिला आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी साकळाई योजनेचा निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली आहे, असा आरोप अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज रात्री नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

साकळाई पाणी योजनेचा मुद्द्यावर दीपाली सय्यद या ९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सय्यद म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व भाजपचे लोकसभेचे तत्कालीन उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेला पाठिंबा दिला होता. तसेच मुख्यमंत्र्यांनी वाळकी येथील सभेत साकळाई योजनेला विधानसभेच्या अगोदर आम्ही सुरुवात करू, असे आश्वासन दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्या आश्‍वासनाचा मुख्यमंत्री व विद्यमान खासदार सुजय विखे यांना विसर पडला आहे.

तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेही याबाबत वेगळेच वक्तव्य करीत असल्याने साकळाई योजना होणार का नाही, याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आता ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून जिल्हा परिषदेसमोर श्रीगोंदा तालुक्यातील सर्व ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे.