सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात ‘या’ मजुराचा काय संबंध ? शेकडो कॉल्समुळे ‘त्रस्त’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मिडियावर अनेक अफवा पसरत आहेत. यामुळे मध्य प्रदेशच्या इंदूरचा एक मजुर चांगलाच वैतागला आहे. याला कारण सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या नावाने फेसबुकवर असलेले फेक पेज ठरले आहे. अंकिता लोखंडे मूळ इंदूरची असून तिच्या नावाने असलेल्या फेक फेसबुक पेजमुळे हा 20 वर्षीय मजुर त्रस्त झाला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मजूराच्या मोबाइल फोनवर सतत येणार्‍या शेकडो कॉल्समुळे वैतागला आहे. कारण टीव्ही अभिनेत्री अंकिताच्या नावाने फेसबुकवर कोणीतरी फेक पेज बनवले असून त्यात ‘अबाउट सेक्शन’मध्ये मजुराचा मोबाइल नंबर टाकला आहे. त्यामुळे अंकिताचा नंबर समजून त्याला अनेकजण फोन करत आहेत. याबाबत मजुराने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. अंकिता लोखंडेच्या नावाने असलेल्या फेक फेसबुक पेजवर मजुराचा नंबर देण्यात आला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला अनेक कॉल्स येत आहेत. काही त्याचा आवाज ऐकून चुकीचा नंबर असल्याचे समजल्यानंतर फोन कट करतात, पण काही सुशांतच्या आत्महत्येबाबत संतापात बोलतात, असे इंदुर सायबर सेलचे पोलिस अधीक्षक जितेंद्र सिंग यांनी सांगितले. याबाबतचा तपास सुरू असून 40 हजार युजर त्या फेक पेजचे फॉलोअर्स आहेत. फेक पेज ऑपरेट करणार्‍याला मेसेंजरद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.