‘ममता दीदी तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला, प्रभू श्रीरामाचा विरोध करणं बंद करा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एक रामायणाची प्रत पाठवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. अपेक्षा आहे की, ममता दीदी रामायणाचे वाचन करतील. प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि यापुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत, असे रामेश्वर शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

रामेश्वर शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राम नामाच्या जय घोषाने ममता बॅनर्जी यांना राग येतो. ममता दीदींना माझी प्रार्थना आहे, जय श्रीराम म्हणणं त्यांनी देखील शिकावं. प्रभू श्रीरामाचा विरोध करणं बंद करा. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमादम्यान तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला. बंगालची जनता विधानसभा निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येत इतक्या वर्षानंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर बनत असतानाही, ममता बॅनर्जी नाराज आहेत, असे देखील शर्मा यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?
कोलकता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोणाबाजीला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.