जयंती दिनीच महात्मा गांधींच्या प्रतिमेवर ‘राष्ट्रद्रोही’ लिहिण्याचा प्रकार, अस्थिकलश चोरीला !

रीवा (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था – जगभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करीत असताना मध्य प्रदेशातील रीवा शहरामध्ये मात्र महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर राष्ट्रद्रोही असे लिहिण्यात आले व तेथील अस्थिकलश चोरुन नेण्याचा प्रकार घडला आहे.

रीवा शहरातील भारत भवनमध्ये हा अस्थिकलश १९४८ मध्ये ठेवण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गुरमीत सिंह यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

२ ऑक्टोंबर रोजी जगभरात महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी रीवा शहरातील भारत भवनमध्ये ठेवण्यात आलेला अस्थिकलश चोरीला गेल्याचे लक्षात आले. तसेच तेथे लावण्यात आलेल्या गांधीजींच्या फोटोवर राष्ट्रद्रोही असे लिहिलेले आढळून आले.

याबाबत रीवा पोलीस अधीक्षक आबिद खान यांनी सांगितले की, याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून गुन्हेगारांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

visit : Policenama.com