दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी खा. नवनीत राणा आक्रमक, म्हणाल्या…

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाईन – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे आता राज्यातील वातावरण तापू लागले आहे. या प्रकरणावर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका मांडली आहे. निलंबित झालेल्या DFO विनोद शिवकुमार याला अटक केल्यानंतर आता अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी खासदार राणा यांनी केली आहे. येत्या चार दिवसांत रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास आपण स्वतः राज्यपाल व संसदेत हा मुद्दा लावून धरू, असा इशारा राणा यांनी दिला आहे.

खाससदार नवनीत राणा यांनी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्याकडे एक तक्रार केली आहे. आपण स्वतः दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डी यांच्याकडे 10 वेळा फोन केले होते. तसेच आमदार रवी राणा यांनी सुद्धा रेड्डी तसेच माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे तक्रार केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा तक्रार केली असताना रेड्डी यांनी सातत्याने डीएफओ शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे रेड्डी सुद्धा शिवकुमार एवढेच दोषी असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.