जागा वाटपावरुन फिसकटले, ‘हा’ पक्ष लढवणार लोकसभेच्या ९ जागा

मुंबई : वृत्तसंस्था – आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना विजयापासून लांब ठेवण्यासाठी एकवटले आहेत. असे असताना जागा वाटपावरुन फिसकटल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेने महाआघाडीत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार राजू शेट्टी येत्या काही दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे.

महाआघाडीत न जाण्याच्या भूमिकेनंतर राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ९ जागा लढवण्याची तयारी दाखविली आहे. स्वाभीमानी संघटनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर सहा जगांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या लोकसभेच्या जागांसाठी शेट्टी ठाम होते.

राजू शेट्टी यांनी बुलढाण्याची जागा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी तर वर्ध्याची जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी मागितली होती. मात्र याबाबत ठोस काही चर्चा झाली नसल्याने राजू शेट्टी एकला चलोची तयारी केली आहे. लोकसभेसाठी हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या नऊ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे.