जळगावात भाजपची बैठक, खडसेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे गैरहजर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे ( BJP) जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP) प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची ( Core Committee) तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार रक्षा खडसे ( Raksha Khadse) अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती आहे.

यावेळी जळगाव जिल्ह्याच्या भाजप कोअर कमिटीच्या या बैठकीला माजी मंत्री गिरीश महाजन,( Girish Mahajan) प्रांत संघटन मंत्री विजय पुराणिक, (Vijay Puranik) विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आदी नेते उपस्थित आहेत. महत्वाचे म्हणजे या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पक्षसंघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक होत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे मात्र भाजपमध्येच राहणार आहे. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मूळगावी कोथळी येथे आल्यानंतर रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते. दरम्यान, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपची ही पहिलीच बैठक होत आहे. त्याचबरोबर त्यांनी जिल्ह्यात येताच राष्ट्रवादीच्या अनेक बैठका घेत अ‌ॅक्शन मोडमध्ये असल्याचे दाखवून दिले होते. गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असणाऱ्या जामनेरमध्ये ( Jamner) राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे आता भविष्यात आता जिह्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काय द्वंद्व रंगणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.