छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांकडून एकेरी उल्लेख, छत्रपती खा. संभाजीराजे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर आता शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. रविशंकर प्रसाद यांनी माफी मागावी अशी मागणी होताना दिसत आहे. अशात राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती ?
संभाजीराजेंनी याबाबत ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपती हे भाजपनेच शिफारस केलेले राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “केंद्रीय विधी व न्याय मंत्री श्री रवी शंकर प्रसाद आपण आधी तमाम शिवभक्तांची माफी मागा. आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार या देशात कुणालाच नाही.”

नेमकं काय घडलं ?
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसादर यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर आपली तोफ डागली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशा आशयाचं वक्तव्य करतनाच त्यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. याचेच पडसाद आता सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.