छत्रपती संभाजीराजेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला दिला इशारा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईवरून वादनग सुरु झाले आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे आमनेसामने आले आहेत. संभाजीराजेंनी केलेल्या ट्विटनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यावर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.

पुरातत्व खात्याच्या सूचनेने रायगडावर चुकीच्या पद्धतीने विद्युत रोषणाई केली. त्यामुळे माझा पुरातत्व खात्यावर आक्षेप होता. या विभागाला धारेवर धरत काळा दिवस हा शब्द पुरातत्व खात्यासाठी उद्देशून बोललो होतो. परंतु, खासदार श्रीकांत शिंदे यांनी चुकीचा अर्थ घेऊन माझ्यावर टीका केली आहे. मला राजकीय टॅग लावलेले चालणार नाही असं त्यांनी बजावलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती बद्दल मला कोणी मला शिकवू नये. रायगडावरून जर कोणी राजकीय बोट दाखवत असेल तर ते सहन केले जाणार नाही. जर कोणी माझ्यावर राजकीय टिक केली तर गाठ माझ्याशी आहे असा इशाराही खासदार शिंदे यांना नाव न घेता दिला. एवढं स्पष्टीकरण देण्याची काही एक गरज नाही परंतु सामान्य नागरिकांचा गैरसमज होऊ नये यासाठी हे स्पष्टीकरण देत असल्याचं खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे?
संभाजीराजेंनी रायगडावर केलेल्या डिस्को लायटिंगवरून ही अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे, भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल अशी टीका केली होती, त्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह दिसणार, राजसदर काळोखात होती, महाराज काळोखात होते, त्यासाठी विद्युत रोषणाई करण्याचा माझा प्रामाणिक हेतू होता, परंतु रोषणाई राजकीय असू शकते हे मला आज कळालं असं त्यांनी म्हटलं होतं, त्यावर संभाजीराजेंनी स्पष्टीकरण दिलं.

काय आहे वाद?
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन शिवसेनेचे कल्याण येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रायगडावर विद्युत रोषणाई केली होती. मात्र त्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवजयंती निमित्ताने भारतीय पुरातत्त्व विभागाने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. असे ट्विट करत संभाजीराजेंनी पुरातत्व विभागाला धरेवर धरले होते. तसेच भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या प्रकरणावरून फटकारलं होतं, अजित पवार म्हणाले होते की, अजाणतेपणाने काही उत्साही लोकांनी रायगडावर लायटिंग केली. पण महाराजांचा वारसा आहे तिथे असं घडणं चुकीचं आहे, काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात, या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य जपलं पाहिजे. रायगडावर डिजे लाईट लावणं अतिशय गंभीर आहे असही अजित पवार यांनी म्हंटल होत.