शिवरायांच्या नावानं राजकारण जरूर करा परंतु महाराजांचा ‘हा’ आदेश वाचून आत्मचिंतनाची गरज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे करत आहेत. या दौऱ्यांच्या दरम्यान दोघंही एकमेकांवर टीका करत आहेत. विरोधी पक्षानं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. परंतु सरकारनं ठोस मदत देण्याची घोषणा अद्यापही केली नाही.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी भाष्य केलं आहे. एक पोस्ट शेअर करत त्यांनी सर्वच नेत्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असं म्हटलं आहे. संभाजीराजे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांच्या एका आदेशाचा दाखलाही दिला आहे.

संभाजीराजे म्हणाले की, “सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवावी. शिवरायांच्या नावानं समाजकारण, राजकारण जरूर करा परंतु त्यांनी 350 वर्षांपूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) या आदेशात असं म्हटलंय की, “कष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलगाडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसै द्या. खंडी, 2 खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडिदिडीनं करू नका मुद्दलच तेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर 2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल” असा शेतकऱ्यांना मदत करण्याचा आदेश छत्रपतींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला होता.

संभाजीराजेंनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद (Press Council) घेत सरकारवर टीका केली होती. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य शासनानं (State government)एकमेकांकडे बोट न दाखवता सामूहिक जबाबदारी घेत संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यभरात पावसानं कहर केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. नद्यांनी पात्र बदललं आहे. तर उभी पिकं आणि माती सुद्धा वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. राज्य सरकारनं प्रति हेक्टरी 50 हजारांची मदत तातडीनं जाहीर करावी. यासोबतच तेलंगणा राज्याच्या धर्तीवर काही रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळेल असं पहावं. मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून आलेल्या संभाजीराजेंनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला होता.

कोरोनामुळं (Covid-19) राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी शेतकरी जगला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कर्ज घ्यावं लागले तरी हरकत नाही. केद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्य शासनानं प्रस्ताव तयार करायला हवा. ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक पाहणीला येऊ शकत नाही. त्यामुळं राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा. रब्बीसाठी बँकासुद्धा आता कर्ज देणार नाहीत. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर केला तर कर्ज मिळू शकेल असंही संभाजीराजे म्हणाले होते.