संजय काकडेंचे 5 तासांत घूमजाव, माजी मुख्यमंत्री फडणवीसांवरच ‘विश्वास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे सहयोगी खासदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. संजय काकडे एका कार्यक्रमात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, यावर संजय काकडे यांनी घूमजाव केला आहे. माझे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात केलेल्या कामांवर माझा पूर्ण विश्वास असून मला भाजपतच न्याय मिळेल असा दावा करत भाजप सोडणार नसल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.

खासदार संजय काकडे हे भाजप सोडून हातात घड्याळ बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, तसे काही नसल्याचा निर्वाळा खासदार संजय काकडे यांनी देऊन चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. काकडे यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात पत्रकारांशी बोलताना आपल्याला राष्ट्रवादीत येण्यासाठी खुद्द शरद पवार यांचा आग्रह असल्याचे सांगितले होते. तसेच जळगावमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रवेश होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, तसे होणार नसल्याचे काकडे यांनी नंतर सांगितले.

मागील काही वर्षापासून संजय काकडे यांनी वादग्रस्त विधानं केल्यामुळे भाजप अडचणीत आला होता. त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत पराभव झाल्यानंतर भाजपने उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. उदयनराजे यांचे पक्षासाठी योगदान काय असा प्रश्न उपस्थित करत काकडे यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला. मात्र, त्यांच्या या विधानामुळे ते अडचणीत आले आहेत.