कन्येच्या पराभवामुळेच एकनाथ खडसेंचा ‘थयथयाट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने कोणताही अन्याय केलेला नाही. त्यांना पक्षाने वेळोवेळी अनेक संधी दिल्या. त्यांच्या कन्येचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे ते भाजपवर टीका करत आहेत, अशी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी खडसेंवर केली आहे. तसेच मी भाजपचा खासदार नाही, भाजपचा सहयोगी खासदार आहे. त्यामुळे भाजपला सोडून जाण्याचा प्रश्न येत नाही, असे संजय काकडे यांनी स्पष्ट केले.

राज्यात अनेक राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आक्रमक झाले असून त्यांनी भाजप आणि पक्ष नेतृत्वावर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपतील वरिष्ठ नेत्यांच्या कारस्थानामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आणि रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. भाजपमध्ये बहुजन समाजातील नेत्यांना डावलले जात आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.

खडसेंनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी, कन्येचा पराभव झाल्याने खडसे टीका करत असल्याचे विधान काकडे यांनी केले आहे. खडसेंना भाजपने खूप संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. त्यांची नाराजी काही कारणांसाठी असू शकेल. मात्र, ते मुलीच्या पराभवामुळे बोलत असतील. आपल्या मुलीला निवडून आणता आले नसल्याची खंत त्यांच्या मनात असेल त्यामुळेच त्यांनी असे विधान करत असतील, असे संजय काकडे म्हणाले.