केंद्रापेक्षा राज्यातच काम करण्याची माझी इच्छा : खासदार संजय काकडे

पुणे (शिवाजीनगर) : पोलीसनामा ऑनलाइन – मला दिल्ली ऐवजी राज्यातच काम करायचे आहे. येत्या काही काळातच पक्षाकडून मला राज्यात चांगली जबाबदारी देण्यात येईल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे राज्य सभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

खासदार संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत येत्या २ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. राज्यातील रिक्त होणार्‍या भाजपच्या तीन राज्यसभा सदस्यांच्या रिक्त जागांसाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार्‍या निवडणूक होत असून भाजपने रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले आणि औरंगाबाद येथील डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केल्याने काकडे यांचा पत्ता कट झाला आहे. या पार्श्‍वभुमीवर काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत वरिल स्पष्टीकरण दिले.

काकडे म्हणाले, पहिल्यापासूनच राज्यसभेत काम करण्यात माझे मन रमत नव्हते. मी राज्यात अधिक चांगले काम करू शकतो हा माझा विश्‍वास आहे. माझ्या ऐवजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा होती. परंतू पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम, हे माननारा मी कार्यकर्ता आहे. येत्या २ तारखेला माझी मुदत संपल्यानंतर मी भाजपचे सदस्यत्व घेणार आहे. यानंतर राज्यातील भाजपच्या सहयोगी सदस्यांसोबतच भाजपमध्ये अधिकृत प्रवेेश करणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येत्या काळात माझ्यावर महत्वाची जबाबदारी सोपविण्याचे आश्‍वासन दिले आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कोट्यवधीच्या आर्थिक घोटाळ्यामध्ये काकडे यांचे व्याही व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अनिल भोसले यांना अटक झाली आहे. भोसले यांच्यावरील कारवाई राजकीय आकसातून झाली नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच संजय काकडे यांनी ग्राहकांना त्यांचा पैसा मिळावा, हीच माझी भुमिका आहे. भोसले यांचे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य होणार नसल्याचेही काकडे यांनी यावेळी नमूद केले.