धर्मेंद्र व कुटुंबाविरोधात खासदार काकडेंचा न्यायालयात दावा !

लोणावळ्याजवळील 185 एकर जागा विकासाचा सांमजस्य करार न पाळल्याप्रकरणी दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या लोणावळ्याजवळील 185 एकर जागेच्या विकासाचा करार सांमजस्य करारानुसार मिळावा आणि सांमजस्य करारानुसार ठरल्याप्रमाणे हाॅटेल व बंगला यांचे बांधकाम सुरू व्हावे म्हणून खासदार संजय काकडे यांनी पुणे न्यायालयात धर्मेंद्र व त्यांच्या दोन्ही पत्नी प्रकाश व हेमा मालिनी, मुले सनी देओल, बॉबी, ईशा, आहना अशा सर्वांविरोधात दावा दाखल केला आहे. आता धर्मेंद्र व संपूर्ण कुटुंबियांना येत्या 10 जानेवारीला पुणे न्यायालयात बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोणावळ्याजवळील औंढे खुर्द गावात अभिनेते धर्मेंद्र व त्यांच्या कुटुंबियांची 210 एकर जागा आहे. यातील धर्मेंद्र यांचा बंगला व लगतची जागा सोडून 185 एकर जागा विकासासाठी खासदार संजय काकडे यांना देण्यात आली. त्यातील 100 एकर जागेवर हॉटेल व उर्वरित जागेवर बंगले बांधले जातील. यात होणाऱ्या नफ्यात 70 टक्के वाटा खासदार काकडे यांचा व 30 टक्के धर्मेंद्र यांचा राहणार होता. जागेचा विकास खासदार संजय काकडे यांनी करायचा होता. धर्मेंद्र व त्यांचे कुटुंबिय आणि खासदार संजय काकडे यांच्यात मे 2018 मध्ये सांमजस्य करार झाला. सांमजस्य करारानुसार विकासाचा करार होणे आवश्यक होते. परंतु, तो झाला नसल्यानेच आपण न्यायालयात गेल्याचे खासदार संजय काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

जागेच्या विकासाच्या करारासाठी धर्मेंद्र यांच्यासोबत आपल्या किमान 30 ते 35 बैठका झाल्या. तर, सनी देओलसोबत 8 ते 10 बैठका झाल्या. परंतु, प्रत्येक बैठकीत त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या व मूळ विकासाच्या कराराबाबत टाळाटाळ करण्यात आली. आता शेवटची बैठक तीन महिन्यांपूर्वी धर्मेंद्र यांच्या वकीलांसोबत झाली. त्यामध्येही सांमजस्य करारानुसार ठरल्याप्रमाणे पुढे जाण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यानंतरही काहीच झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव विकासाचा करार सांमजस्य करारानुसार व्हावा व काम सुरु व्हावे म्हणून न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्याय देवतेकडे नक्की न्याय मिळेल, असेही खासदार काकडे म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/